स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सामनातून रोखठोक समाचार घेण्यात आला. या राजकीय घडामोडीचे विश्लेषण करताना संजय राऊत यांनी दस्तूरखुद्द ठाकरे बंधूंचे कान टोचले. त्यांच्या या जळजळीत लेखातून भाजप-शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विजयाचे तर महाविकास आघाडीच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली. विधानसभेनंतर महाविकास आघाडीतील नैराश्य कायम असल्याचे दिसते. तर दुसरीकडे भाजप आणि मित्र पक्षांचं तळागळात पाळंमुळं घट्ट होत असल्याचे दिसते. महापालिका निवडणुकीत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने सरस कामगिरी केली आहे. या सर्व निवडणुकीतील गोळाबेरीज सामनातून मांडण्यात आली. या निवडणुकीचे खासदार संजय राऊत यांनी संपादकीयमधून विश्लेषण केले. त्याचवेळी त्यांनी ठाकरे बंधूंचे कानही टोचले. या संपादकीयमधून त्यांनी सत्ताधान्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असा खणखणीत फटकाराही विरोधकांना लगावला आहे. नैराश्यच्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी सामानातील संपादकीयाची आज मोठी चर्चा सुरू आहे.
विश्लेषण करताना संजय राऊत यांनी भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या विजयाचं गमक कशात आहे , याची बारीकसारीक नोंद घेतली आहे. सताधाऱ्यांना फटकारे लगावणारे संजय राऊत यांनी यावेळी स्वपक्षीय आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले व जिंकले किंवा हरले, पण सरशी भाजपचीच झाली. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने ‘बुथ’ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. जेथे कार्यकर्ते नाहीत तेथे इतर पक्षांतले लोक सरळ विकत घेतले. निवडणुका जिंकताना कोणतेही सोवळे भाजप पाळत नाही. भाजपने ग्रामीण महाराष्ट्रातले सर्व ‘तालेवार’ लोक, कारखानदार आपल्या पक्षात ओढले. त्यांच्या बळावर ते निवडणुका जिंकत आहेत.” असे विश्लेषण त्यांनी केले.
तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचंही विश्लेषण केले. फडणवीस स्वतः निवडणुकीत उतरले. भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरले. पक्षाचा कार्यक्रम राबवला. निवडणूक लढवणे हाच एककलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते स्ट्रॅटेजी’ ठरवतात. त्यासाठी त्यांनी पैशांचं बळ वापरलं असा मुद्दा राऊतांनी मांडला. तर या निवडणुकीत शिंदे गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत 162 जागा मिळाल्या. रत्नागिरी, रायगडवर त्यांची सत्ता
आली, तर सिंधुदुर्ग भाजपने ताब्यात घेतले, याकडे राऊतांनी लक्ष वेधले.
राष्ट्रवादीवर मोठी बोलकी प्रतिक्रिया
शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडला. पुण्यात ते जिंकले, पण लोक त्यांच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय? हा प्रश्न आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली व त्यांच्या पक्षाने 165 जागा जिंकल्या हे विसरून चालणार नाही याकडे राऊतांनी मोठे भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादीची जमेची बाजू मांडतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पीछेहाटही समोर आणली.
शिवसेनेच्या पिछेहाटीवरून घातले अंजन
महाराष्ट्राच्या राजकारणातील खन्या शिवसेनेची पीछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे. शिवसेनेची पीछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पीछेहाट. शिंदे यांचे नेतृत्व है ठाकन्यांपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पीछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधान्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असे मत राऊतांनी यावेळी मांडले.
उद्धव आणि राज ठाकरेंचे कान टोचले
लोकभावनेचा दाखल देत यावेळी संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे चांगलेच कान टोचले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. मोदी, शहा, फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे पूर्ण व्यापारीकरण केले हे खरे. तरीही त्यांचेही लोक मोठया प्रमाणात पराभूत झाले व सुनीता चव्हाण यांच्यासारखे साधे उमेदवार आजही लोक निवडून देतात , याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे .

Post a Comment